 |
| अँड्रॉइडचा लोगो |
अँड्रॉइड हा माझा ब्लॉगरवरील पहिलाच लेख असल्यामुळे लिहिताना कुठून सुरुवात करावी हेच मला कळत नव्हते अखेर सुरुवात केली. बहुतेकांनी अँड्रॉइड बद्दल ऐकलेच असेल किंवा अँड्रॉइडची जादू स्वतः अनुभवली देखील असेल. काय म्हणता, "ऐकलं आहे अँड्रॉइड बद्दल पण माहित नाही काय आहे ते?". तर जास्त विचार करू नका मी आहे ना... मी सांगतो तुम्हाला हे अँड्रॉइड आहे तरी काय? आणि काय चीज आहे हे अँड्रॉइड? चला तर मग आज आपण ह्या अँड्रॉइडबद्दल अजून थोडे जाणून घेऊया.
अँड्रॉइड हि एक ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच एक कार्यप्रणाली आहे जी गूगलने खास मोबाईल फोनसाठी तयार केली आहे. हि लिनक्स या मुक्तस्त्रोत कार्यप्रणाली वर चालणारी एक मुक्तस्त्रोत कार्यप्रणाली आहे. मुक्तस्त्रोत असल्यामुळे जगातील कोणतीही व्यक्ती जीला प्रोग्रामिंग बद्दल थोडेसे ज्ञान आहे ती व्यक्ती अँड्रॉइडचा विकास सहजपणे करू शकते. ३१ ऑक्टोबर २००८ रोजी गूगलने अँड्रॉइडची प्रथम आवृत्ती संपूर्ण जगासमोर आणली आणि बघता बघता तिने जगातील बहुतेक सर्व मोबाईल फोन प्रेमींवर खासकरून तरुणांवर आपली छाप टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अँड्रॉइड प्रथम मोबाईल फोनवर प्रदर्शित करण्यात आली पण सध्या अँड्रॉइड टॅबलेट पी.सी.साठी देखील लोकप्रिय होत आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट पी.सी.साठी सध्याची नवीन आवृत्ती अँड्रॉइड ४.२ आहे जी "जेली बीन" या नावाने ओळखली जाते. मुक्तस्त्रोत असल्यामुळे अँड्रॉइडचा विकास झपाट्याने होत आहे. अँड्रॉइडमध्ये जावा प्रोग्रामिंगसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळालेले आहे.
अँड्रॉइड आज इतकी लोकप्रिय झाली आहे कि, जगभरातील बहुतेक प्रसिद्ध मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांनी आपापल्या नवनवीन मोबाईल फोनमध्ये अँड्रॉइडचा वापर करण्यास सरुवात केली आहे. मोबाईल फोनमध्ये अँड्रॉइड असणारी जगभरातील बहुतेक सगळीच मोबाईल फोन प्रचंड प्रसिद्ध होत आहेत. त्यात एच.टी.सी., सॅमसंग, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एलजी, डेल, इत्त्यादी प्रसिद्ध मोबाईल फोन उत्पादक कंपन्या अग्रेसर आहेत इतकेच काय तर भारतातील मायक्रोमॅक्स, स्पाइस, इत्यादी मोबाईल फोन कंपन्यासुद्धा मागे नाहीत. अँड्रॉइड असणारा एक मोबाईल बाजारात आला नाही कि दुसरा मोबाईल लगेच येऊन मनाला भुरळ लाऊन जातो. त्यामुळे हा फोन घेऊ कि तो फोन घेऊ असे विचार लगेचच मनात येत राहतात. अँड्रॉइड कार्यप्रणाली असणारे मोबाईल फोन ऍपलच्या आयफोन खालोखाल प्रचंड गतीने लोकप्रिय होत आहेत. इतकेच काय तर २०१० च्या वर्षासरती अँड्रॉइड जगातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याने जगावर सलग १० वर्षे मोबाईल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीला मोठा धक्का दिला हा धक्का इतका मोठा होता कि त्यातून सिंबियन अजूनही सावरू शकला नाही. २०१० च्या वर्षासरती कॅनालायीसने केलेल्या रिसर्चनुसार जगभरातून अँड्रॉइड कार्यप्रणाली असणारे ३३% मोबाईल फोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% मोबाईल फोन विकले गेले.
अँड्रॉइड मुक्तस्त्रोत असल्यामुळे कोणतीही व्यक्ती आपल्याला हवे तसे बदल अँड्रॉइडमध्ये करू शकते तसेच अँड्रॉइडचे
सॉफ्टवेयर म्हणजेच उपयोजने तयार करू शकते. अँड्रॉइडच्या या गुणधर्मामुळे आतापर्यंत गूगलच्या अँड्रॉइड मार्केटमध्ये २,५०,००० हून अधिक
सॉफ्टवेयर आणि गेम्स अँड्रॉइडवर चालणाऱ्या मोबाईल फोनसाठी उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य
सॉफ्टवेयर मोफत आहेत. अँड्रॉइडसाठी दर ६-६ महिन्यांनी नवनवीन विकसित आवृत्त्या येत असल्यामुळे आपण खरेदी केलेला अँड्रॉइड फोन लगेचच जुना म्हणजेच आऊटडेटेड वाटू लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या काही अँड्रॉइड विकासकांच्या वेबसाईटवर आपल्या जुन्या अँड्रॉइड फोनसाठी नवनवीन आवृत्तींच्या
अपडेट्स उपलब्ध आहेत पण त्या काहीश्या अवैध म्हणजेच इललीगल वाटू लागतात.
अँड्रॉइड फोन आपल्याला हव्या त्या कंपनीचे आणि हव्या तशा किंमतीत बाजारात उपलब्ध असल्याचे दिसून येतात. साधारण रुपये ५,००० ते ४०,००० हून अधिक रुपयांत अँड्रॉइड फोन उपलब्ध असल्यामुळे अँड्रॉइड गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय होत आहे. वायरस तसेच मालवेअर पासून सुरक्षेसाठी अँड्रॉइडसाठी वायरस विरोधी सॉफ्टवेयर उपलब्ध आहेत. बहुतेक अँड्रॉइड फोनमध्ये सर्वसाधारण सुविधा तर असतातच त्याच शिवाय ३जी, वाय-फाय, जास्त क्षमतेचा रॅम आणि जलद मायक्रोप्रोसेसर, जलद आंतरजाळ न्याहाळक म्हणजेच वेब ब्राउजर, जादा क्षमतेचा मेमरीकार्ड वापरण्याची सुविधा, जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा, मल्टी-टच स्क्रीन, मल्टी-टास्किंग, इत्त्यादी जादा सुविधा देखील असतात. हे सर्व माफक दरांत उपलब्ध असल्यामुळे अँड्रॉइड तरुणांत खूप लोकप्रिय होत आहे.
असा आहे हा अँड्रॉइड. ह्याचाबद्दल जितके सांगावे तितके थोडेच आहे. काय मग आवडली का अँड्रॉइडबद्दलची माहिती? मग घेतायना एक नवीन अँड्रॉइड फोन? कोणत्या कंपनीचा फोन घेतला आणि कितीला घेतला ह्याबद्दल मला सांगायला विसरू नका हां बर! मलाही आवडेल तुम्ही तुमचा आनंद माझ्यासोबत शेअर केलेला. तर लेख कसा वाटला ह्याबद्दल मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बर मलाही आवडेल तुमच्या प्रतिक्रिया वाचून त्यांना प्रतिक्रिया करायला. धन्यवाद!